रत्नागिरी : पूर्वीच्या काळी लहान मुलांनी प्रश्न विचारले की, पालक पाप-पुण्याचा विषय असल्याचे सांगत. परंतु, आताच्या विद्यार्थ्यांना भारत शिकवण्यासाठी वैज्ञानिक आधारावर आपली प्राचीन परंपरा शिकवली पाहिजे. जुन्या गोष्टी नवीन दृष्टीने सांगितल्या पाहिजेत, भारतीय संस्कृतीचा अभिमान जपणारा माणूस म्हणून घडवणे आवश्यक आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. दिलीप बेतकेकर यांनी केले.
रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातून आतापर्यंत ५० हजारांहून विद्यार्थी शिकून गेले. त्यांचे पालक, माजी शिक्षक हा सर्व मोठा डेटा असून, याद्वारे महाविद्यालयाने नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत, असेही प्रा. बेतकेकर म्हणाले. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणायचे की, आयटी आयटी भरपूर झाले आता टीआय टीआय म्हणजे थिंक इंडिया, टीम इंडिया साकारली पाहिजे. जिथे संधी नाही ते शिक्षण देऊन संधी निर्माण केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी व नियामक मंडळ सदस्य डॉ. संजय केतकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी उपस्थित होते.
डॉ. साखळकर यांनी सांगितले की, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आज तज्ज्ञ डॉक्टर, इंजिनियर, सीए आणि वकील झाले आहेत. अभ्यंकर व जोगळेकर यांच्या देणगीमुळे महाविद्यालयाला बळ मिळाले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक बाबूराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या दूरदृष्टीमुळे कोकणातील विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊ लागले. त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.
शिल्पा पटवर्धन आणि प्रा. दुदगीकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. गोसावी यांनी केले. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. माधवी लेले यांनी पद्य सादर केले तर प्रा. प्रभात कोकजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विद्याधर केळकर यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 05/Nov/2025














