माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूलमध्ये अशोक पोंक्षे कलादालनात १५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय निसर्गचित्र स्पर्धा, तर १२ नोव्हेंबर रोजी माखजन दशक्रोशीतील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहेत. १२ रोजी होणारी दशक्रोशीस्तरीय चित्रकला स्पर्धा तीन गटांत होईल. ३ री, ४ थी पहिला गट, ५ वी ते ७ वी दुसरा गट, तर ८ वी ते १० वी तिसरा गट असेल.
प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढले जाणार असून प्रत्येकी भेटवस्तू, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. ही स्पर्धा प्रशालेत १२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ यावेळेत होणार आहे. १५ रोजी राज्यस्तरीय निसर्गचित्र कला स्पर्धा होणार असून यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात येतील. ही स्पर्धा खुली असून आगाऊ नाव नोंदणी करावी लागणार आहे. प्रथम क्रमांकास १२ हजार, द्वितीय १० हजार, तृतीय ८ हजार, उत्तेजनार्थ ६ हजार व प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. निसर्गचित्र रेखाटण्यासाठी आंबव पोंक्षे व बुरंबाड अशी गावे निवडण्यात आली आहेत. दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा १५ रोजी दुपारी ३ वाजता संस्था अध्यक्ष किशोर साठे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ रंगकर्मी व आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष, उद्योजक अशोक पोंक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 06/Nov/2025














