रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांकडून अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना धान्य दिले जाते. मात्र राज्यासह जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना मागील पाच महिन्यापासूनचे कमिशन अद्याप मिळालेले नाही. दिवाळी सण होऊनसुद्धा त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे उपासमारीची वेळ आली असून रेशनदुकानदार अद्याप कमिशनच्या प्रतीक्षेत आहेत.
रेशनदुकानदारांना १०० किलो धान्य विक्रीवर १५० रुपये कमिशन मिळत होते. दरम्यान, २० ऑगस्टपासून हा दर वाढवून १७० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. त्यामुळे सुरळीत कमिशन मिळत असताना जून महिन्यापासून रेशन दुकानदारांना कमिशन मिळाले नसून रखडले आहे. ऐन सणासुदीत कमिशन येईल या प्रतीक्षत दुकानदार होते. मात्र कमिशन अद्याप न मिळाल्यामुळे दुकानदार आर्थिक कोंडीत अडकला आहे. वारंवार जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांना विचारून, मागणी करूनही अद्याप कमिशन मिळत नसल्यामुळे रेशनदुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाने लवकरात लवकर रेशनदुकानातील कमिशन द्यावे अशीच मागणी दुकानदार करीत आहेत.
९५२ रेशन दुकानदारांना फटका
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ९५२ रेशन दुकान आहेत. त्यापैकी ८४२ रेशनदुकान सध्या सुरू आहेत. रेशनदुकानदारांना जून-जुलै ते ऑक्टोबर या काळातले कमिशन मिळालेले नाही. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ९५२ दुकानदारांचा समावेश आहे. रेशन दुकानदारांचा उदरनिर्वाह संपूर्णतः या कमिशनवर अवलंबून असल्यामुळे असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांना जून महिन्याचे कमिशन देण्यास सुरुवात झाली आहे. जुलै, ऑगस्ट महिन्याचे कमिशन शासनाकडून अद्याप जमा झाले नाही. जिल्हापुरवठा विभागाकडून सर्व माहिती शासनास पाठवली आहे-रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांना चार महिन्याचे कमिशन अद्याप मिळालेले नाही. जून महिन्याचे कमिशन देण्याचे प्रोसेस सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. लवकरात लवकर रेशन दुकानदारांचे कमिशन मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे अशोक कदम,अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 06/Nov/2025














