रत्नागिरी : मे महिन्यापासून पडत असलेल्या पावसाने आंबा बागायतदार संकटात सापडले आहे. मे महिन्यात पडलेल्या पावसाने शेवटच्या टप्प्यातील आंबा खराब झाला आणि आता पडत असलेल्या पावसामुळे आंबा पीक हे उशिरा येणे, हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी., अशी मागणी आंबा बागायतदार संघाने केले आहे.
संघातर्फे बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करून आपल्या समस्या मांडण्यात आल्या. यावेळी बाबा साळवी, टी. एस. घवाळी, दीपक उपळेकर, अशोक भाटकर, राजेंद्र कदम, रामचंद्र मोहिते, सदाशिव पाचकुडे, शोएब काझी आदी उपस्थित होते. मे महिन्यात ५ मे पासून पाऊस पडायला सुरुवात झाली. तो थांबलाच नाही यामुळे शेवटच्या टप्प्यातला आंबा हा खराब झाला. यामुळे यावेळी शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. यावेळची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे यावेळी सांगण्यात आले.
सध्या अजूनपर्यंत पाऊस चालूच आहे. यामुळे यावेळचा आंबा हंगाम लांबणीवर पडणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागणार, हे निश्चित आहे. शासनाने याचादेखील विचार करणे गरजेचे आहे. शासनाने शेती तज्ज्ञांच्या सल्ल्याने विचार करून शेतकऱ्यांना यापूर्वीची सर्व कर्ज माफ करावीत व पुढील हंगामासाठी नवीन कर्ज देण्यात यावीत, असे या संघाचे म्हणणे आहे.
पीक विम्याचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना मिळत नाही. विम्याचे निकष बदलून निकष ठरविताना शेतकरी संस्थांच्या प्रतिनिधीला घ्यावे. पीक विम्याची रकम शासनाने खासगी कंपन्यांमार्फत न देता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. शेतकऱ्याला खते व कीटकनाशके, बि-बियाणे योग्यवेळी मिळावी. जिल्हा व तालुकास्तरावर प्रयोगशाळा स्थापन कराव्यात, अशी मागणी या संघाने शासनाकडे केली आहे.
कोकणात शेतकऱ्यांना माकडांपासून प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच अन्य वन्य प्राण्यांपासून देखील नुकसान होत असते. याचे संपूर्ण जबाबदारी शासनाने घेऊन सदर प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीदेखील संघातर्फे करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 06/Nov/2025












