◼️ ‘यश ट्रान्सपोर्ट’ विरोधात ट्रक मालक पुन्हा आक्रमक; २०१३ पासूनची रक्कम न दिल्याने शेकडो कुटुंबं कर्जबाजारी. ‘पैसे देण्याची दानत नाही’, पत्रकार परिषदेत खडेबोल
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील जयगड परिसरातील लॉरी असोसिएशनच्या ट्रक मालकांनी रत्नागिरीतील ‘यश ट्रान्सपोर्ट’चे (Yash Transport) मालक आणि उबाठा गटाचे उपनेते बाळ माने यांच्याविरोधात पुन्हा एकदा संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. गेल्या २०१३ सालापासून थकीत असलेली सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम न दिल्यामुळे शेकडो ट्रक मालक कर्जबाजारी झाले असून, अनेकांचे ट्रक बँकांनी जप्त करून ओढून नेल्याचा गंभीर आरोप बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
बाळ माने यांनी ट्रक मालकांची थकीत असलेली दीड कोटींची रक्कम त्वरित द्यावी, अशी जोरदार मागणी जयगड येथील लॉरी असोसिएशनने केली आहे.
‘पैसे देण्याची दानत नाही’
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ट्रक मालकांनी बाळ माने यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले. असोसिएशनने म्हटले की, “बाळ माने यांची पैसे देण्याची दानतच नाही. एक चांगला चाललेला ट्रान्स्पोर्ट व्यवसाय केवळ त्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे बुडाला. त्यामुळे त्यांनी राजकारणात विकासकामांवर बोलण्यापूर्वी लोकांचे देणे असलेले पैसे आधी परत करावेत,” असे खडेबोल सुनावण्यात आले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ट्रक मालकांनी सांगितले की, २०१३ मध्ये बाळ माने यांची ‘यश ट्रान्सपोर्ट’ कंपनी कार्यरत असताना, माने यांनी ट्रक मालकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश (Cheques) दिले होते. मात्र, हे दिलेले सर्व धनादेश बाऊन्स झाले.
तेव्हापासून आजपर्यंत वारंवार मागणी करूनही बाळ माने यांनी ‘आज देतो, उद्या देतो’ अशी केवळ आश्वासने दिली, परंतु पैसे दिले नाहीत. यामुळे अनेक ट्रक मालकांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला, त्यांची कर्जे बुडाली.
४०० पैकी ३०० ट्रक जप्त
या आर्थिक फसवणुकीचा फटका इतका गंभीर बसला की, असोसिएशनशी संबंधित असलेल्या ४०० पैकी ३०० पेक्षा जास्त ट्रक बँकांनी कर्ज न फेडल्यामुळे ओढून नेले आहेत, असा खळबळजनक आरोपही यावेळी करण्यात आला.
मध्यस्थीचे प्रयत्नही अयशस्वी
गेल्या काही वर्षांत हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा मध्यस्थीचा प्रयत्न झाला. २०१८ साली बाबू पाटील यांनी मध्यस्थी केली होती. तसेच, २०२३ मधील खासदार नारायण राणे यांच्या निवडणुकीवेळी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनेही ट्रक मालकांनी पैशांची मागणी केली होती. निवडणूक काळात बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यावर माने यांनी काही थोडी रक्कम दिली, मात्र मुख्य थकीत दीड कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत, असे ट्रक मालकांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला लॉरी असोसिएशनचे योगेंद्र कल्याणकर, अनिरुद्ध साळवी, आदेश पाखरे, विकी सावंत, प्रमोद घाटगे, अनिस मिरकर, शराफत गडबडे, अजिम चिकटे, शरद चव्हाण, आदेश पावरी, दीपक पाटील, राजेश पाटील, उदय शिर्के, विनय चव्हाण, अनिल केदारी, रवींद्र केदारी, मुदस्सर ठाकूर आणि गिरीष महाडिक यांच्यासह अनेक पीडित ट्रक मालक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 06-11-2025












