रत्नागिरी पालिका मतदार यादीतील गोंधळ अखेर संपला; ६,६९९ तक्रारी, १,९०९ दुबार नावे, एका कुटुंबाला उच्च न्यायालयाची पायरी

रत्नागिरी (प्रतिनिधी): आगामी रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या मतदार यादीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी ६४ हजार ७४० मतदारांची अंतिम यादी पालिकेने जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या यादीवर आधारित तयार करण्यात आलेल्या या मतदार यादीबाबत सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण होते. प्रारंभी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ७४ हजारपेक्षा जास्त मतदारांच्या प्रारूप यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्या होत्या.

तब्बल ६,६९९ तक्रार अर्ज

या प्रारूप यादीसंदर्भात रत्नागिरी शहरातील नागरिकांकडून तब्बल ६ हजार ६९९ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. यादीतील घोळ इतका मोठा होता की, एका कुटुंबाला तर आपल्या मतदार यादीतील स्थलांतराच्या (Migration) नोंदणीसाठी थेट उच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागली आणि न्यायालयाकडून अंतिम निर्णय आणावा लागला.

पालिकेने दाखल झालेल्या सर्व हरकतींवर स्थळ पाहणी करून अहवाल तयार केला. यानंतर प्रांताधिकारी श्री. जीवन देसाई यांच्यासमोर यावर सविस्तर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीअंती:

  • एकूण तक्रारी: ६,६९९
  • मान्य तक्रारी: ३,२२५
  • अमान्य तक्रारी: ३,४۷४

या प्रक्रियेनंतरच हरकती व आक्षेप निकाली काढत अंतिम यादी निश्चित करण्यात आली, जी प्रारूप यादीपेक्षा जवळपास १०,००० मतांनी कमी आहे.

१,९०९ दुबार मतदारांवर ‘हमीपत्रा’चा वॉच

यादीच्या छाननीमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल १ हजार ९०९ मतदारांची नावे दुबार (Duplicate) असल्याचे समोर आले. या दुबार मतदारांना आता मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी नगर परिषदेला हमीपत्र (Undertaking) लिहून द्यावे लागणार आहे.

या सर्व मतदारांची नावे पालिकेच्या नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात आली आहेत. त्यांनी नक्की कोणत्या ठिकाणी मतदान करायचे आहे, हे या हमीपत्राद्वारे स्पष्ट करावे लागेल. जर या मतदारांनी वेळेत प्रतिसाद दिला नाही, तर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर त्यांच्याकडून हे हमीपत्र लिहून घेतले जाईल, अशी स्पष्ट माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अनेक वाद, तक्रारी आणि कायदेशीर लढाईनंतर आता ६४ हजार ७४० मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने, रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.