खेडशी लॉज देहव्यापार प्रकरण : ६ महिने फरार असलेला मुख्य संशयित सलमान मुकादमला अखेर जामीन; ‘तो महिलांचे शोषण करायचा’, सरकार पक्षाचा जोरदार विरोध

◼️ रत्नागिरी सत्र न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला; अटकेच्या भीतीने होता पसार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी शहराजवळील खेडशी येथील एका लॉजवर चालणाऱ्या हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणातील (Khedshi Lodge Prostitution Case) मुख्य संशयित, सलमान नजमुद्दीन मुकादम (३०, रा. मिरकरवाडा), याला अखेर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांकडून होणाऱ्या अटकेच्या भीतीने सलमान हा गेल्या ६ महिन्यांपासून फरार होता.

या प्रकरणातील सहआरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळाल्याची संधी साधत, सलमानने रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी हा जामीन अर्ज ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

शहराच्या जवळच असलेल्या खेडशी येथील एका लॉजवर १३ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या ४ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या अनैतिक व्यापारप्रकरणी अरमान खान याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले, तर सलमान नजमुद्दीन मुकादम व अन्य एक संशयित अशा तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

६ महिन्यांपासून होता फरार

गुन्हा दाखल होताच अरमान व अन्य एका आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या प्रकरणाचा मुख्य संशयित मानला जाणारा सलमान मुकादम हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता.

न्यायालयात काय झाला युक्तिवाद?

बचाव पक्षाचा युक्तिवाद: सलमानच्या वतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, त्याला या गुन्ह्यामध्ये नाहक गुंतवण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास आता पूर्ण झाला असून, सहआरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) देखील दाखल झाले आहे. संशयित सलमान हा रत्नागिरीत स्थायिक असून कुटुंबियांसह राहतो. त्यामुळे तो फरार होणार नाही व तपासात पोलिसांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.

सरकारी पक्षाचा जोरदार विरोध : सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. “सलमान हा थेट या गुन्ह्यात सहभागी असून काही काळापासून फरार होता. इतकेच नव्हे, तर त्याच्याविरुद्ध पूर्वीचे एक अपहरणाचे प्रकरणही (Kidnapping Case) सुरू आहे. आरोपीने महिलांचे शोषण करून पैशासाठी त्यांच्याकडून हा देहव्यापार करून घेतला आहे. अशा आरोपीला जामीन दिल्यास तो पुन्हा फरार होण्याची दाट शक्यता आहे,” असा गंभीर युक्तिवाद करत सरकारी पक्षाने जामीन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी केली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने अटी व शर्तींवर सलमान मुकादम याला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 06-11-2025