रत्नागिरी:
प्रख्यात लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरीत ‘आर्ट सर्कल’ च्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय भव्य साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने रत्नागिरीकरांसाठी ही साहित्य आणि कलांची दिवाळी रंगणार आहे.
अभिवाचन स्पर्धा आणि रंगमंचीय सादरीकरण (दि. ७ आणि ८ नोव्हेंबर)
कार्यक्रमाची सुरुवात दि. ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृह, पटवर्धन हायस्कूल (सुनीताबाईंची शाळा) येथे होणार आहे.
- उद्घाटन: अभिनेत्री शुभांगी दामले, लेखिका नीता कुलकर्णी, आणि दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्या हस्ते अभिवाचन स्पर्धेचे उद्घाटन होईल.
- स्पर्धेचे स्वरूप: ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात होणार आहे. यात बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर आणि आरती प्रभू यांच्या कवितांचा (काव्य अभिवाचन) आणि सुनीताबाईंच्या पुस्तकांमधील आशयाचा (गद्य अभिवाचन) समावेश असेल.
- विशेष अभिवाचन:
- ७ नोव्हेंबर: स्पर्धा संपल्यानंतर शुभांगी दामले ‘आहे मनोहर तरी’ या गाजलेल्या पुस्तकातील भागाचे अभिवाचन करतील.
- ८ नोव्हेंबर: ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांचे अभिवाचन सादर होईल.
संध्याकाळचे नाट्यमय आकर्षण: - ७ नोव्हेंबर (सायंकाळी ७.००, नाट्यगृह): पु. ल. देशपांडे लिखित ‘मॅड सखाराम’ आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘मराठी वाङमयाचा घोळीव इतिहास’ हे दोन दीर्घांक सादर होतील.
- ८ नोव्हेंबर (सायंकाळी ७.००, सावरकर नाट्यगृह): उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘रूंग्ली रूंग्लीयॉट’ या विशेष कार्यक्रमातून जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई यांच्या पत्रांचे अफाट साहित्यिक मूल्य माधुरी पुरंदरे आणि गिरीश कुलकर्णी आपल्या अभिवाचनाद्वारे रसिकांसमोर आणतील.
- साहित्यिकांची मांदियाळी आणि चर्चासत्र (दि. ९ नोव्हेंबर)
दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून सावरकर नाट्यगृहात साहित्य आणि सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर विविध कार्यक्रम होतील. - चर्चा आणि सादरीकरण:
- किरण येले: ‘सुनीताबाईंच्या आत्मचरित्राचे वेगळेपण’.
- प्रवीण बांदेकर: ‘आहे मनोहर तरी- खूप काही आहे’.
- कौशल इनामदार: ‘कवितेचे विभ्रम’ (कविता आणि संगीत).
- वैभव जोशी: ‘केशरी प्रहर’ (स्वतःच्या कवितांचे सादरीकरण).
- किरण यज्ञोपवित: ‘सुनीताबाई आणि नाटक’.
- मंगला गोडबोले: सुनीताबाईंच्या आठवणी आणि सहवास.
- भारती आचरेकर: पु. ल. देशपांडे यांच्याबद्दलचे किस्से आणि गाण्यांचे सादरीकरण.
- कौटुंबिक आठवणी: पु. लं.चे पुतणे जयंत देशपांडे आणि सुनीताबाईंच्या माहेरचे संतोष ठाकूर ‘भाई काका आणि सुनीता आत्या’ यांच्या जवळच्या आठवणी आणि किस्से सांगतील.
महत्त्वाची नोंद: ९ तारखेला उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी दुपारच्या भोजनाची सोय सावरकर नाट्यगृहातच करण्यात आली आहे.
पुस्तक प्रदर्शन आणि कला दालन
- बाळ ठाकूर यांचे चित्र प्रदर्शन: ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे सुप्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर यांनी साकारलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे व रेखाचित्रांचे प्रदर्शन तीनही दिवस नाट्यगृहात पाहण्यासाठी खुले राहील.
- पुस्तक प्रदर्शन व विक्री: सावरकर नाट्यगृहात साहित्यप्रेमींसाठी निवडक आणि दर्जेदार पुस्तकांचे छोटेखानी प्रदर्शन आणि विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवेश विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाला रत्नागिरीतील काव्यप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आर्ट सर्कल, रत्नागिरीने केले आहे. या उपक्रमाला उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 06-11-2025












