दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पर्यटकांनी हुल्लडबाजी करत सरळ आपली कार समुद्राच्या आत नेल्याची घटना घडली. समुद्रकिनाऱ्यावर स्पष्टपणे बंदीचे फलक लावलेले असतानाही, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सूचना करूनही पर्यटकांनी हट्टीपणा करत गाडी पाण्यात घातली. यावेळी गाडीतील चारही पर्यटक मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे.
गाडी पाण्यात अडकताच ग्रामस्थांनी त्वरित मदतीसाठी पुढाकार घेत प्रयत्न सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मदत करू पाहणाऱ्या गावकऱ्यांवरच पर्यटकांनी अरेरावी सुरू केली. “आमची गाडी आम्ही काढू, आम्हाला कुणाची मदत नको,” अशा उद्धट सुरात पर्यटकांनी उत्तर देत मदत नाकारली. या उद्धटपणानंतर मात्र स्थानिक ग्रामस्थांनी मदत मागे घेतली. त्यामुळे गाडी समुद्राच्या पाण्यात अधिक खोलवर अडकत गेली आणि अखेर बाहेर काढण्याची कोणतीही शक्यता उरली नाही. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पर्यटकांच्या अतिउद्धट आणि बेफिकीर वर्तनामुळे त्या वाहनाला प्रत्यक्षात ‘जलसमाधी’ मिळाल्याचे पहावयास मिळत होते.
पर्यटनस्थळावर नियमांचे उल्लंघन, दारूच्या नशेत स्टंटबाजी आणि स्थानिकांना त्रास देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत वाढल्या आहेत. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहनांवर प्रतिबंधासाठी सतत सूचना फलक लावले असूनही काही पर्यटक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 06/Nov/2025












