Chiplun : कोयना वीजनिर्मिती प्रकल्प ; ३०० फूट खोल विहिरीमध्ये उतरून गळतीची पाहणी

चिपळूण : कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याची गळती काढण्यासाठी पोफळीत मागील चार दिवसांपासून प्रात्यक्षिक घेतले जात आहे. जलसंपदा विभागाचे अभियंते ३०० फूट खोल विहिरीत उतरून बोगद्यातील गळतीची पाहणी करत आहेत. बोगद्यातील विहिरीचे काँक्रिटचे अस्तरीकरण जागोजागी सुटले आहे. त्याची वेळेत दुरुस्ती केली नाही तर ही गळती वाढण्याचा धोका आहे, असा अंदाज कोयना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कोयना वीजप्रकल्पाच्या बोगद्यातून पाण्याची गळती होत असल्याने पोफळीच्या पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगेतून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. यामुळे वीजप्रकल्पाला कोणताही धोका नाही. पोफळीतील सर्जवेलला गळती लागून पाणी ईव्हीटीमध्ये येऊन झिरपत आहे. तेच पाणी डोंगरातून वाहत आहे. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून निघणाऱ्या अधिजल भुयाराच्या शेवटी सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० ला बांधण्यात आली असून, सह्याद्रीच्या कातळात ३०० मीटर खोल आहे. अधिजल भुयाराच्या विहिरीला अर्ध्या मीटर रुंदीचे काँक्रिटचे अस्तरीकरण केले आहे. तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवले आहेत; मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल (ईव्हीटी) किंवा आपत्कालीन झडपेद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत जाऊन डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे. २०१२ पासून हा प्रकार चालू झाला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून हा प्रकार वाढला आहे. यामुळे वीजगृहाला अथवा डोंगराला कोणताही धोका नाही; पण पाणी वाया जात आहे.

पोफळी सर्जवेलची जागा दुर्गम ठिकाणी आहे. त्या ठिकाणी यंत्रसामुग्री नेणे सोपे नाही. ही दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच करणे शक्य आहे आणि त्यासाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागणार असल्यामुळे दुरुस्तीपूर्वी पाहणीसाठी नोव्हेंबर २०२५ निवडण्यात आले. कोयना जलसंपदा विभागाचे सातारा, कोयना आणि अलोरे येथील अधिकारी व कर्मचारी मागील चार दिवसांपासून येथे तब्बल तीनशे फूट खोल विहिरीत उतरून बोगद्याची पाहणी करत आहेत. त्यासाठी आवश्यक ती साधने त्या ठिकाणी आणण्यात आली आहेत.

विहिरीची ६५ वर्षात कसलीही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे हे अस्तरीकरण खराब होत आहे. ते पूर्ण खराब झाले तर पुन्हा अस्तरीकरण करण्यासाठी खूप मोठा खर्च येईल. त्याशिवाय प्रकल्पही बंद ठेवावा लागेल. त्यामुळे तत्काळ गळती काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही गेट ऑपरेट होतात का, हे पाहिले आहे. बोगद्यात काँक्रिटचे अस्तरीकरण कुठे कुठे आणि किती निघाले आहे. त्याची पाहणी केली. पुढील काही दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू करू- विश्वजित सानप, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग

२२ कोटींचा निधी मंजूर
कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याची गळती काढण्यासाठी महानिर्मिती कंपनीने २२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. दुरुस्तीपूर्वी कामाची पाहणी करण्यासाठी तब्बल पाच दिवस टप्पा १ आणि रची वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली होती. दुरूस्तीच्यावेळी सुद्धा हे दोन्ही प्रकल्प बंद ठेवण्याची तयारी महानिर्मिती कंपनीने दर्शवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 06/Nov/2025