जैतापूर : राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, नाटे येथे शाळेतील पोषण आहार तांदुळ चोरी प्रकरणी शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, राजापूर गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले तसेच इतर अधिकारी यांनी शाळेला तातडीने भेट देऊन या प्रकाराची विस्तृत माहिती घेतली.
तर यानंतर या अधिकाऱ्यांनी नाटे सागरी पोलीस स्थानक येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांची भेट घेतली आणि तपासाच्या घडामोडींची माहिती घेतली. या वेळी माध्यमांशी बोलताना शिक्षणाधिकारी लोहार यांनी सांगितले की “हा प्रकार अत्यंत गंभीर असून आपण याची सखोल चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असेही लोहार यांनी यावेळी सांगितले.
या घटनेनंतर रात्री सुमारे दोन वाजल्यापासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेच्या आवारात जमा झाले होते. सकाळपर्यंत शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यावर ग्रामस्थांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला. असे प्रकार वारंवार होत असूनही वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचना मिळूनही दुर्लक्ष करतात, म्हणूनच असा प्रकार घडला असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. या प्रकरणात शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या सहभाग असून शिक्षण व शिक्षकी पेशासाठी अत्यंत लाजीरवाणी घडना असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. या घटनेचा तपास सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्याकडून सुरू असून, शिक्षण विभागानेही स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणी शिक्षक, मुख्याध्यापक व अन्य संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 06/Nov/2025












