Kokan Railway : कोकण रेल्वेतील साखळी ओढणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमध्ये अलार्म चेन पुलिंगचा (एसीपी) चुकीचा वापर केल्याप्रकरणी एका प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकादरम्यान घडली. प्रवाशाचा मोबाईल फोन ट्रेनमधून खाली पडल्यामुळे त्याने अलार्म चेन ओढून ट्रेन थांबवल्याचे पुढे आले आहे.

कोकण रेल्वेच्या निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एकाने अलार्म चेन ओढली. त्यामुळे गाडी अचानक थांबली. संबंधित प्रवासी ट्रॅकवर उतरून आपला फोन परत आणण्यासाठी खाली गेला. कर्तव्यावर असलेले टीटीई पी. एम. कृष्णन आणि अजित जाधव यांनी तत्काळ या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या अहवालाच्या आधारे रेल्वे पोलिसांनी भारतीय रेल्वेकायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या कलमानुसार अलार्म चेनचा बोट अयोग्य वापर करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले की, अलार्म चेन फक्त वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन परिस्थितीतच वापरावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 07/Nov/2025