दापोली : दापोली तालुक्यातील जवळपास ७० जांभाचिरे खाणींमधून परवानगीपूर्वीच बेकायदेशीर उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मुबीन शौकत मुल्ला (आष्टेकर) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित महसूल विभागाला पत्रव्यवहार करून चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे दापोली तालुक्यातील बेकायदेशीर उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यासंदर्भात दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने खाण तपासणीची नोटीस दिली असून, सर्व खाणींची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्या तालुक्यात चिरेखाणींची मोजणी आणि तपासणी मोहीम जोरात सुरू आहे.
गणपती उत्सवानंतर काही ठिकाणी जांभाचिरा उत्खनन पुन्हा सुरू झाल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे वारंवार येत होत्या, मात्र त्या दुर्लक्षित झाल्याने हा विषय अधिक तीव्र झाला आहे, असे बोलले जात आहे. मुबीन शौकत मुल्ला (आष्टेकर) यांनी सांगितले की, बेकायदेशीर उत्खननाविरोधात आम्ही लवकरच दापोली तहसीलदारांची भेट घेऊन तपासाची स्थिती जाणून घेणार आहोत.
दरम्यान, दापोली तालुक्यात खरोखरंच बेकायदेशीर जांभा चिरा उत्खनन झाले आहे का, आणि झाले असल्यास त्यावर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 07/Nov/2025














