Dapoli : आंजर्ले खाडीत धडधडताहेत वाळूचे सक्शन पंप

रत्नागिरी : दापोलीतील अडखळ-आंजर्ले खाडीतील वाळूचे सक्शन पंपाद्वारे बेसुमार उत्खनन होत असल्याची तक्रार प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. उत्खनन करणारी टोळी दाखलेबाज गुन्हेगार असून विनापरवाना वाळू चोरी होत असल्याची तक्रार अडखळचे रहिवाशी अब्दुल रऊफ अब्दुल करीम काझी यांनी प्रांताधिकाऱ्यांसह दापोली पोलिसांकडे केली आहे.

लोखंडी नौकांवर सक्शन पंप लावून खाडीतून काढलेली वाळूची डंपरद्वारे वाहतूक होत आहे. तडीपारीची कार्यवाही झालेल्यांकडून ही वाळूचोरी होत असून बेकायदेशीरपणे सक्शन पंपाने होणाऱ्या य वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे रऊफ काझी यांच्या निवेदनात म्हटले आहे. या बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे खाडीतील माशांचे प्रजनन धोक्यात येत आहे.

त्याचबरोबर या उत्खननामुळे खाडी किनारी असलेल्या कांदळवन झाडांचीही हानी होत असल्याचे म्हटले आहे. महसूल, मत्स्य व्यवसाय आणि पोलिस यंत्रणेने यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. दररोज सायंकाळी ७ वा. पासून सकाळी ७ वा. पर्यंत वाळू उपसा करणारे सक्शन पंप धडाडत असतात. याच मुदतीत डंपरने वाळू दुसरीकडे हलवली जात आहे. खासगी जमिनीतून डंपर जाण्यासाठी रस्ते तयार केले जात आहेत. या खासगी रस्त्यांसाठी कोणतीही शासकीय परवानगी नसल्याचेही रऊफ काझी यांनी प्रांताधिकारी व पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 07/Nov/2025