राजापूर : राजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून राजापूर नगर परिषदेच्या दहा प्रभागातील अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार, तर ३ हजार ९२४ पुरूष मतदारांचा समावेश आहे. महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने
राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षासह नगरसेवक म्हणून कुणाला संधी द्यायची त्याचा निर्णय महिलांच्या हाती असणार आहे.
तब्बल ४ वर्षे लांबलेली नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे. प्रभाग रचना, नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दहा प्रभागातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
या निवडणुकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरुष मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ६० मतदार हे प्रभाग क्र. ६ मध्ये असून सर्वात कमी मतदार हे प्रभाग ३ मध्ये ५९६ आहेत.
यामध्ये प्रभाग क्र. १ मध्ये एकूण ९०० मतदार असून ४३८ पुरूष, तर ४६२ महिला, प्रभाग क्र. २ मध्ये एकूण ७५५ मतदार असून ३६२ पुरूष, ३९३ महिला, प्रभाग क्र. ३ मध्ये सर्वात कमी म्हणजेच एकूण ५९६ मतदार असून यामध्ये २८९ पुरूष, तर ३०७ महिला मतदार, प्रभाग क्र. ४ मध्ये एकूण ७५६ मतदार असून यामध्ये पुरूष ३६८, तर महिला ३८८, प्रभाग क्र. ५ मध्ये एकूण ७५९ मतदार असून यामध्ये ३६७पुरूष, तर महिला ३९२ महिला मतदार, प्रभाग क्र. ६ मध्ये सर्वाधिक एक हजार ६० इतके मतदार असून यामध्ये पुरुष ४८६, तर ५७४ महिला मतदार, प्रभाग क्रमांक ७ मध्ये एकूण ९२६ इतके मतदार असून यामध्ये ४४३ पुरुष, तर ४८३ महिला मतदार, प्रभाग क्रमांक ८ मध्ये एकूण ६८३ इतके मतदार असून यात ३४५ पुरूष, तर ३३८ महिला मतदार, प्रभाग क्र. ९ मध्ये एकूण ९२३ मतदार असून यामध्ये ४५२ पुरूष व ४७१ महिला मतदार, तर प्रभाग क्र. दहामध्ये एकूण ७८५ मतदार असून यामध्य ३७४ पुरूष व ४११ महिला मतदारांचा समावेश आहे. नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता शहरातील राजकीय वातावरण निर्मिती होऊ लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 07/Nov/2025














