Ratnagiri : जिल्ह्यात अतिवृष्टीने १६ कोटी ५० लाखांचे आर्थिक नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. यामुळे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील दळणवळण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीत एकूण १६ कोटी ५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. यात जिल्ह्यातील ६२४ रस्ते, १०८ साकव, ८८ पूल बाधित झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. शासनाकडून खड्डे भरण्यासाठी निधीच येत नसल्याने या रस्त्यांचे भवितव्य अंधारात आहे.

दळणवळणांच्या मूलभूत साधनांना मोठा फटका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील चिंताजनक आहे. पुराच्या पाण्याने आणि भूस्खलनाने जिल्ह्यातील ६२४ रस्ते गंभीरपणे खराब झाले आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडणे, संरक्षक भिंती कोसळणे किंवा काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे वाहून जाणे अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यांप्रमाणेच ग्रामीण भागाला मुख्य मागाँशी जोडणारे १०८ साकव (छोटे पूल) देखील पूर्णतः किंवा अंशतः उद्ध्वस्त झाले आहेत. साकवांच्या नुकसानीमुळे अनेक वाड्यावस्त्यांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या नद्यांवरील किंवा महत्त्वाच्या मार्गांवरील ८८ मोठे पूल बाधित झाले आहेत.

निधीची गरज
खराब झालेले रस्ते, साकव आणि पूल तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. कारण, पावसाळ्यातील ही नुकसानग्रस्त स्थिती कायम राहिल्यास पूरपरिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यावर परिस्थिती आणखी बिघडू शकते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने त्वरित निधी मंजूर करून दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

काही पुलांचा पाया कमकुवत झाला आहे तर काही पुलांच्या संरक्षक कठड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना न केल्यास जिल्ह्याच्या मुख्य वाहतूक मार्गावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने निधीची मागणी केली आहे. बांधकाम विभागाने बाधित ६२४ रस्ते, साकव आणि पुलाच्या कामांसाठी अंदाजे १६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

tata motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 07/Nov/2025