संगमेश्वर : वन विभागाच्या पथकाने मौजे राजवाडी (ब्राह्मणवाडी, साई मंदिरसमोर) येथे ६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता गस्तीदरम्यान संशायस्पद फिरणारी एक बोलेरो पिकअप वाहन (एमएच ०८ एपी ८६२१) थांबवून झडती घेतली असता शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह चारजणांना अटक करण्यात आली.
झडतीदरम्यान १२ बोअर बंदक, सहा जिवंत काडतुसे, दोन हँड टॉर्च आणि पिकअप वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत वाहनातील चौघेही शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याचे स्पष्ट झाले. विश्वनाथ शांताराम मालप (वय २९, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर), गजानन मानसिंग इंदुलकर (४३, रा. हेदली, ता. संगमेश्वर), रूपेश धोंडू पोमेंडकर (४१, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर) व राहुल रवींद्र गुरव (२८, रा. तिवरे, घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) जी. गुरुप्रसाद (भा.व.से.), विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई, तसेच सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सूरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी सहभाग घेतला. तसेच पोलिस पाटील अणदेरी महेंद्र होडे, राजवाडी पोलीस पाटील विलास राऊत, सुलतान मालगुंडकर, अनंत तोरस्कर यांनी सहकार्य केले. वन विभागाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अशा प्रकारच्या शिकारीच्या घटना किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 08/Nov/2025












