आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : तहसीलदार विकास गंबरे

राजापूर : नगर परिषद निवडणूकीत सर्व राजकिय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी केले आहे.

राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता व कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी सर्व राजकिय पक्षांचे पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित केली होती. नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या या बैठकीत गंबरे यांसह राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, निवासी नायब तहसीलदार विलास सरफरे, राजापूर न. प. चे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी गंबरे यांनी या नगर परिषद निवडणूकीच्या एकूणच कार्यक्रमाबाबत व नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच निवडणूक आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचना व माहितीचे वाचन करून याबाबत सर्व राजकिय पक्षांना माहिती दिली. तसेच उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक लागणारी माहिती, घ्यावयाची खबरदारी, निवडणूक खर्च, सुचक, आरक्षित प्रभागांतील उमेदवारांना आवश्यक असणारी कागदपत्रे, खर्चाची मर्यादा, प्रचारसभा व परवानग्या याबाबत माहिती दिली. या निवडणूक कालावधीत सर्व राजकिय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी असे आवाहन केले.

निवडणूकीच्या एकूणच कार्यक्रम व पध्दतीबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले जाणार असून या कक्षांतुन आवश्यक ती माहिती, परवानग्या दिल्या जातील असेही गंबरे यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी सर्व राजकिय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 08/Nov/2025