गुहागर : नगरपंचायतीच्या १७ प्रभाग व नगराध्यक्षपद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे निवडणुकीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परीक्षित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी परीक्षित पाटील यांनी माहिती देताना १० ते १७नोव्हेंबर या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे. यामध्ये १६ तारखेला रविवार येत असून त्यादवशी नामनिर्देशन पत्र घेतले जाणार नाहीत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमध्ये अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन भरून त्याची एक प्रत निवडणूक निर्णय विभागाकडे सादर करावयाची आहे. १८ नोव्हेंबर रोजी छाननी केली जाणार असून सायंकाळी लगेचच त्याला प्रसिद्धी दिली जाणार आहे. १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर हा कालावधी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा असून २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल.
छाननी वेळी ज्यांचे अपील असतील त्यांना दिनांक २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपले नामनर्देशन पत्र मागे घेता येतील. २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह देऊन अंतिम चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान, तर ३ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
गुहागर नगरपंचायतीमधील एकूण १७प्रभागांमध्ये नगरसेवक निवडले जाणार असून नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. गुहागर नगरपंचायतीचे एकूण मतदार संख्या पुरुष २८५६, तर स्त्री ३१०५ असून एकूण ५९६१ मतदार संख्या आहे. स्ट्राँग रूम हे श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य या इमारतीमध्ये केले जाणार असून मतमोजणी गुहागर रंग मंदिरमध्ये होणार आहे. एकूण १७ मतदान केंद्र उभारणार असून यामध्ये आदर्श महिला केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र अशी दोन आदर्श मतदान केंद्र म्हणून लावली जातील. प्रत्येक केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी आणि १ चतुर्थी श्रेणी कर्मचारी असे एकूण ५ कर्मचारी नियुक्त असून एकूण २५० कर्मचाऱ्यांची या निवडणूक प्रक्रिया करता निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांपमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना योग्यता सूचना देण्यात आल्या आहेत. ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची जाहीर सभा मुदत देण्यात आली असून रात्री बारा वाजता प्रचार बंद करण्यात येणार आहे.
यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, सहायक निवडणूक अधिकारी स्नेहल मेहता या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहकार्य करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना समस्या निराकरणासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 10/Nov/2025














