गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात २५ ऑक्टोबर रोजी बुडून बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार हे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे ते गणपतीपुळे नजीकच्या कुठल्याही समुद्रकिनारी आढळून आल्यास तत्काळ जयगड सागरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापूर येथील नितीन पवार (वय ३५) हे आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे २५ ऑक्टोबर रोजी देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आंघोळीसाठी समुद्रात उतरण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते समुद्राच्या पाण्यात ओढले गेले.
त्यानंतर ते २५ ऑक्टोबरच्या बेपत्ता झालेल्या दिवसापासून पंधरा दिवस उलटून गेले तरीदेखील अद्याप मिळालेले नाहीत. त्यांचा मोठ्या युद्धपातळीवर शोध जयगड पोलिस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून गणपतीपुळे समुद्रकिनारी व नजीकच्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ व डोंगराळ भागात सुरू आहे. तसेच जयगड पोलीस ठाण्याकडून समुद्रात बोटीच्या सहाय्याने गस्त घालून नितीन पवार यांचा शोध घेण्यात आला आहे. मात्र तरीदेखील त्यांच्या शोधाचे चक्र जयगड पोलिसांसमोर कायम राहिले आहे.
नितीन पवार हे बेपत्ता झालेल्या दिवसापासून अद्याप स्थानिक जीवरक्षक, व्यावसायिक, ग्रामसुरक्षा रक्षक दलाचे सदस्य, पोलिसपाटील व पोलिस कर्मचाऱ्यांना आढळून आलेले नाहीत. त्यांचा गणपतीपुळेबरोबरच नजीकच्या मालगंड भंडारले बरे नेवरे काजीरभाटी आदी. समुद्रकिनारी जयगड पोलीस ठाण्याकडून कसून शोध सुरू आहे. तसेच त्यांच्या शोधासाठी त्यांची कुटुंबीय व नातलग मंडळीदेखील अधूनमधून गणपतीपुळे दाखल होत असतात.
त्यांच्यासमवेत जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने अतिशय जबाबदारीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, परंतु अद्याप पोलिसांना यश आले नसून गणपतीपुळे व नजिकच्या समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांना बेपत्ता नितीन पवार यांची माहिती मिळाल्यास जयगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बेपत्ता नितीन पवार यांच्या कुटुंबीयांकडूनदेखील सोशल मीडियावर हरवला आहे अशा स्वरूपाची पोस्ट वायरल करण्यात आली असून शोधासाठी आवाहन करण्यात आले आहे. एकूणच अद्याप बेपत्ता असलेले नितीन पवार हे सापडत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 10/Nov/2025













