शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळा : डॉ. संजय भावे

देवरुख : शेतकऱ्यांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शेती व्यवसाय हा कामगारांकडून न करता स्वतः केला पाहिजे. आपली संस्कृती ही कृषीशी निगडित आहे. नावीन्यपूर्ण शेती करणे आवश्यक आहे. परिसंस्थेला बाधा न आणता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी देवरुख येथे गुरुवारी केले.
संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि अँग्रेस्टार शेतकरी कंपनी देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात गुरुवारी आयोजित अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिविर व कृषी प्रेरणासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

डॉ. भावे पुढे म्हणाले, आपल्याकडे २२ लाख मे. टन काजूवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे, तर भारतात ८ लाख मे. टन काजू आपण तयार करतो. उर्वरीत १४ लाख मे. टन काजू आपण आयात करतो. खाण्यासाठी २ लाख मे. टन काजू लागतो, तर एक लाख मे. टन काजूपासून तयार करणाऱ्या पदार्थासाठी लागतो.

शेतीमध्ये समस्या निर्माण होण्यासाठी शेतकरी जबाबदार आहे. जास्तीचे उत्पन्न घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने शेती केली जाते. त्याचा परिणाम शेतीवर होतो. ज्या भागात शेती करण्यासाठी नांगरणी केली जात नाही त्याठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होते. नांगरणी केल्यामुळे पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे पाण्याची पातळीत वाढ होते. शेतकऱ्यांनी अश्वगंधाची लागवड केली पाहिजे.

यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळू शकते. अश्वगंधा पिकासाठी हेक्टरी ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दोन हेक्टरपर्यंत अनुदान दिले जाईल. अश्वगंधा हे पीक तालुक्याला वेगळी ओळख करून देणार पीक असल्याचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी सांगितले, तर अश्वगंधाचे तालुक्यात चांगले पीक येऊ शकते
.
आयुर्वेदात अश्वगंधाला खूप महत्त्व असल्याचे डॉ. संदीप कांबळे यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न विचारले. या प्रश्नांना डॉ. भावे यांनी समर्पक उत्तरे देत शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे, ओंकार बेलोसे, निखिल कोळवणकर, हेमंत तांबे, श्री. शेलार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 10/Nov/2025