गुहागर : गुहागर-विजापूर महामार्गासाठी भूसंपादित करण्यात आलेली जागा ताब्यात देण्याची प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी भूसंपादन विभागाने राबवली आहे. अनेक दुकाने व घरे मोकळी केली जात असून आता पुढे काय? रस्ता रुंद होणार का? रस्त्याचे काम सुरू होणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असले तरी येत्या काही दिवसांत काँक्रिटीकरण कामाच्या अगोदर या दोन किलोमीटर रस्त्याचे सात मीटरचे डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर काँक्रिटीकरणासाठी मान्यता घेऊन काम सुरू केले जाणार आहे.
शहराच्या दोन किलोमीटर अंतरावर येऊन थांबलेले काँक्रिटीकरण झिरो नंबरपर्यंत आणण्याकरिता भूसंपादन विभागाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया राबविली आहे. मुसळधार पावसातूनही दुकाने हटवण्याची जोरदार मोहीम दुकान मालकांनी राबवली आहे. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया १३०० मीटरपर्यंत झाली आहे. मात्र, उर्वरित अर्धवट राहिलेली भूसंपादन
प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ३० ऑक्टोबर रोजी जेसीबी व ट्रॅक्टरची तयारी करून उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादित जागेचा राष्ट्रीय महामार्गाकडे ताबा देण्याची प्रक्रिया राबवली. स्वतः उपस्थित राहून १८ मीटरच्या क्षेत्रामधील असलेली छोट्या मोठ्या फलकासह दुकाने, बांधबंधिस्ती तोडावयास सुरुवात केली.
यावेळी अनेकांनी आपल्या दुकानांमध्ये साहित्य असून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये आम्ही स्वतः आमचे दुकाने व साहित्य काढू असे लेखी दिले आहे. यामुळे गेले तीन दिवस मुसळधार पावसातही दुकाने खाली करून आपले प्रत्येक साहित्य काढण्याचे काम छोटे-मोठे व्यावसायिक करत आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाकरिता भूसंपादन विभागाने रस्ता ताब्यात देण्याची प्रक्रिया राबवली. छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी शहर बाजारपेठेला बाजारपेठ म्हणून साज चढविला होता. मात्र आता दुकाने हटल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
आता या मोकळ्या झालेल्या जागेचे तातडीने रुंदीकरण होणार आहे का, असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. अशातच दुरवस्था झालेल्या गुहागर शहरातील दोन किलोमीटर मार्गाचे ७ मीटर रुंदीने डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी ज्या-ज्या ठिकाणी संरक्षक कठडे, छोटे पूल आवश्यक आहेत त्याची पाहणी केल्यानंतर काँक्रिटीकरणासाठी मंजुरी घेतली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 11/Nov/2025













