गुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.
गुहागर नगर पंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ठिकाणी राजकीय वातावरण तापू लागले आहे. दरम्यान, निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून आपले जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी देखील अनेकजण इच्छुक आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार शोधण्याची वेळ प्रत्येक पक्षावर आली आहे. यावेळी येथील नगर पंचायत निवडणुकीसाठी महायुती होणार, असे आतापर्यंत संकेत आहेत. तरीही जर स्वबळावर लढण्याची वेळ आली तर प्रत्येक पक्ष आपापल्या परीने पूर्णपणे तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
या निवडणुकीसाठी उबाठा गट व मनसे यांची युती होण्याची चिन्हे आहेत तर शरद पवार गटदेखील त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. एकूणच ही निवडणूक चुरशीची होणार असून पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार परीक्षित पाटील हे काम पाहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 11/Nov/2025













