जीवनशैली बदला, कर्करोग टाळा : स्वाती सालवार

चिपळूण : बदलती जीवनशैली मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून, अनेक आजारांची ती जननी बनली आहे. व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार आणि ताणतणाव या कारणांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे, असे मत कम्युनिटी हेल्प ऑफिसर स्वाती सालवार यांनी व्यक्त केले.

सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयात कर्करोग प्रतिबंध जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या साहाय्यक आरोग्य अधिकारी प्रफुल्ल केळसकर, आशाताई, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण आदी उपस्थित होते. सालवार यांनी शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कर्करोग टाळण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, तंबाखू व दारूचे सेवन टाळणे आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारणे किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी घराघरात कर्करोग प्रतिबंधाविषयी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 11/Nov/2025