रत्नागिरी : रत्नागिरीतील क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ आणि हजारो तरुणांना व्यायामाची गोडी लावणारे ज्येष्ठ व्यायाम शिक्षक श्री. दिनकर रघुनाथ पवार (पवार सर) यांचे आज (बुधवार) पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
‘पवार सर’ हे रत्नागिरीतील शिवाजी नगर व्यायाम शाळेचे व्यायाम शिक्षक म्हणून सर्वांना सुपरिचित होते. त्यांनी कित्येक वर्षे या व्यायाम शाळेच्या माध्यमातून शेकडो तरुणांना केवळ व्यायामाचे धडे दिले नाहीत, तर आयुष्यभरासाठी शिस्त शिकवली. त्यांच्या कठोर शिस्तीतून आणि मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत अनेक नामवंत कबड्डी पटू, मल्लखांब खेळाडू आणि कुस्तीगिर तयार झाले.
श्री. पवार सर यांनी केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर एक कुशल संघटक म्हणूनही क्रीडा क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. ते रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच, त्यांनी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे माजी खजिनदार म्हणूनही यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली होती.
आज दुपारी अंत्यसंस्कार
त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवार, दुपारी ११.३० वाजता रत्नागिरीतील चर्मालय स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यापूर्वी, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव एकता मार्ग, गौरीनंदन वसाहत, उद्यमनगर, रत्नागिरी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. श्री. पवार सर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, सर्व स्तरांतून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.













