Ganja Case : चिपळुणात गांजा विकणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या सवतसडा धबधब्यानजीक गांजा विकणाऱ्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी राकेश वसंत पडवेकर (पेढे-कुंभारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून १९,५६० रुपयांचा ३२६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. राकेश हा मुंबई-गोवा महामार्गावरच्या सवतसडा धबधब्यानजीक गांजा विकरण्यासाठी येत असल्याची गोपिनीय माहिती चिपळूण पोलिसांना समजली होती.

त्यानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी प्रकाश बेले तसेच पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण विभागाच्या पथकाने राकेश याला पकडण्यासाठी गुन्हा प्रकटीकरण विभाग प्रमुख पोलिस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलिस हेड कॉन्स्टेबल बुशाल शेटकर, रोशन पवार, संदीप माणके, रूपेश जोगी, शैलेश वणगे आदीच्या पथकाने सोमवारी सवतसडा धबधबा परिसरात सापळा रचला. अखेर त्या ठिकाणी राकेश येताच त्याचावर या पथकाने धाड टाकली. सुरुवातीला राकेश याने पोलिसांना उडवाउडावीची उत्तरे दिली. मात्र, त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडून १९,५६० रुपये किंमतीचा ३२६ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गांजा प्रकरणी राकेश पडवेकर याच्यावर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या गांजा प्रकरणी आणखी कोणाचा तरी सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 12/Nov/2025