Mandangad ST Depo : मंडणगड व्यवस्थापन-कर्मचारी संघर्षात;अनेक प्रवासी फेऱ्या रद्द

मंडणगड : मंडणगड आगारातील चालक, वाहक कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांच्या कारभारा विरोधात सोमवारी १० नोव्हेंबर रोजी ओव्हरटाईम न करण्याची घेतलेली भूमीका आज दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सोमवारी आगारातील वाहक व चालक श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर ओव्हर टाईम करण्यास नकार दिल्याने १८ प्रवासी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर मंगळवारी लांब पल्ल्याच्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मात्र ग्रामिण भागातील फेऱ्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, विभागीय वाहतूक अधिकारी यांनी मंडणड आगारास भेट दिल्यानंतर अधिकारी, आगारव्यवस्थापक व ओव्हरटाईम करण्यास नकार देणाऱ्या कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही मंडणगड बसस्थानकाच्या प्रवासी फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडलेले दिसून आले. लांब पल्याच्या फेऱ्यांमध्ये बीड १, मुंबई २, शिर्डी,
बोरीवली १, नालासोपारा १ अशा एकूण १४ फेऱ्या काल रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भात आगारव्यवस्थापक मदनीपाशा जुनैदी यांच्याशी पत्रकारांनी संपर्क केला असता आगारात कर्मचारी संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगीतले.

दरम्यान आगरव्यवस्थापनाने विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून केलेली व्यवस्था कुठेतरी कमी पडल्याचेही दिसून आले आहे. गत एक वर्षापासून आगारात कमी मनुष्यबळाची समस्या आहे. आगारात कर्मचारी संख्या चालक, वाहक १६८ आवश्यक असताना १४१ कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण २७ कर्मचारी कमी आहेत. दररोज १९४ फेऱ्या आगाराच्या माध्यमातून सोडण्यात येतात व प्रवासाचे एकूण अंतर १२१३५ किलोमीटरचा प्रवास इतके आहे.

कार्यालयीन क्लार्क व वाहतूक नियंत्रक असे ४ कर्मचारी कमी आहेत. कर्मचारी कमी असल्याने नैमित्तिक कामकाजासोबतच ओव्हर टाईमची डबल ड्युटी करावी लागते, १० नोव्हेंबर पासून एकूण १६ कर्मचाऱ्यानी डबल ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे चालक कमतरता निर्माण झाली असल्याची माहीती मिळाली आहे.

आगार व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जाते. किरकोळ कारणावरूनही आगरव्यवस्थापक यांच्याकडून नियमावर बोट ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांची तक्रार या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 12/Nov/2025