चिपळूण : लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे पालिका निवडणुकीत घरातून मतदान करण्याची संधी वृद्ध मतदारांना मिळणार नाही. अशा मतदारांना मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करावे लागणार आहे. आवश्यकता भासल्यास कुटुंबातील सदस्याला मदतनीस म्हणून या मतदाराला मदत करता येईल. अपंग आणि वयोवृद्ध लोकांचे मतदान व्हावे, यासाठी उमेदवारांना प्रयत्न करावे लागणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वयोवृद्ध आणि अपंग लोकांना घरातून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदानाच्या १५ दिवस अगोदर सर्वेक्षण करून अशा मतदारांचा शोध घेण्यात आला होता. यावेळी मात्र विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती देणारी स्लिप निवडणुकीमध्ये सरकारी यंत्रणेकडून दिली जाणार नाही. प्रत्येक मतदाराचे मत तो राहत असलेल्या प्रभागात असल्याने त्या मतदान केंद्रावर मदतकेंद्र असणार आहे. तेथे मतदाराला कोणत्या कक्षात मतदान करायचे आहे याची माहिती दिली जाणार आहे.
दिव्यांगांसाठी केंद्रावर सुविधा
घरून मतदानाची सुविधा नसली, तरी वृद्ध मतदारांना सोबत कुटुंबातील सदस्याला मदतनीस म्हणून न्यायचे असल्यास अर्ज करून त्यांना मदत करता येईल. एकापेक्षा अधिक व्यक्तींना मदतनीस म्हणून काम करता येणार नाही. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदाराचे मत तो राहत असलेल्या प्रभागात असल्याने त्या मतदान केंद्रावर मदतकेंद्र असणार आहे. तेथे मतदाराला कोणत्या कक्षात मतदान करायचे आहे याची माहिती दिली जाणार आहे.
चिपळूण पालिकेची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत आहोत. – आकाश लिगाडे, प्रांताधिकारी चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 13/Nov/2025














