Ganpatipule : सुट्टीच्या हंगामात गणपतीपुळे समुद्रकिनारी गस्त वाढवणार

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील सर्व स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक देवस्थानचे सुरक्षारक्षक व ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे सदस्य, पोलिसपाटील आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी सतर्क राहून सुरक्षेच्या दृष्टीने कटाक्षाने आणि गांभीर्याने लक्ष घालून पर्यटकांना समुद्राच्या धोक्याबाबत योग्य त्या सूचना व माहिती देऊन पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच याचबरोबर दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या हंगामात समुद्रकिनाऱ्यावर ज्यादा पोलिस कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली जाईल, असे जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य पर्यटन स्थळ गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच यंत्रणांनी सतर्क राहता यावे या उद्देशाने जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात आयोजित विशेष बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पोलिस निरीक्षक संजय पाटील पुढे म्हणाले, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. हे लक्षात घेऊन स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक व ग्रामस्थांनी सतर्क राहून येणाऱ्या भक्त व पर्यटकांना वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या समुद्राच्या भौगोलिक स्थितीची माहिती देऊन समुद्रात पडलेले चाळ व खड्डे आदींबाबत सूचना कराव्यात तसेच येणाऱ्या भक्त व पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात आंघोळीसाठी जाऊ नये, समुद्राच्या कमी पाण्यातच आंघोळीसाठी उतरावे, त्याचबरोबर शक्यतो लहान मुलांना समुद्राच्या पाण्यात पाण्यात नेऊ नये अशा सूचना भक्त व पर्यटकांना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच समुद्रकिनाऱ्यावर पोलीस कर्मचाऱ्यांची नेहमीच गस्त राहणार आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला संबंधित स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी योग्यप्रकारे सहकार्य करावे व समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवून दुर्घटनेला आळा घालण्यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, अशा सूचना पोलिस निरीक्षक पाटील यांनी या विशेष बैठकीत केल्या.

या बैठकीला संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच नीलेश कोल्हटकर, पंच डॉ. श्रीराम केळकर, विद्याधर शेंडे, मालगुंड गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, उपसरपंच संजय माने, परिसरातील पोलिसपाटील, व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 12/Nov/2025