लांजा : मागील दोन्ही पाय जायबंदी झाल्याने नर जातीचा दीड ते दोन वर्षांचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची घटना आज रविवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता केळंबे येथे घडली होती. रेस्क्यू ऑपरेशन करून या बिबट्याला पिंजराबंद करण्यात आले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या हा जायबंदी झाल्याचे तपासात पुढे आले असून त्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती लांजा वनपाल सारीक फकीर यांनी दिली. लांजा तालुक्यातील केळंबे येथील सुधा विष्णुनगर येथे रस्त्यापासून काही अंतरावर बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थ खानविलकर यांनी वनविभागाला रविवारी सकाळी ९ वाजता दिली. बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लांजा वनपाल सारीक फकीर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी कळंबे येथे दाखल झाले.
अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे या नर जातीच्या बिबट्याचे मागील दोन्ही पाय जायबंदी झाले असल्याने व गंभीर दुखापत असल्याचे आढळून आले. मात्र तो जखमी असला तरी मोकळा असल्याने त्याच्या जवळ जाऊन त्याला पिंजऱ्यात बंदिस्त करणे धाडसाचे होते. त्यामुळे वनविभागाचे वनपाल सारीक फकीर व सहकार्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करून त्याच्याजवळ वाहन नेण्यात आले.
मोठ्या शिताफिने त्याला जाळी टाकून जेरबंद केले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी १० वाजता या जखमी बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाळीच्या सहाय्याने पिंजऱ्यात बंद केले. या बिबट्याच्या बिबट्याची पशुधन वैद्यकीय अधिकारी लांजा यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. मात्र त्याचे दोन्ही पाय जायबंदी असल्याने व दुखापत गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात येत असल्याचे वनपाल सारीक फकीर यांनी सांगितले.
बिबट्याला पिंजराबंद करण्यात वनपाल सारिक फकीर, वनरक्षक कोर्ले बाबासाहेब ढेकळे वनरक्षक लांजा नमिता कांबळे यांना लांजा वनमजूर संजय गोसावी, सत्यवान गुरव, लांजा पोलीस नासिर नावलेकर, नितेश राणे, दीप्ती शेटकर, ग्रामस्थ पांडुरंग साळुंखे, राजेश झोरे, सुनील गावडे, महेश लांजेकर, सुधाकर झोरे, बशीर लांजेकर, साळुंखे यांनी सहकार्य केले. सदरचे रेस्क्यू ऑपरेशन श्रीमती गिरजा देसाई विभागीय वन अधिकारी चिपळूण, श्रीमती प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण, प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले तसेच यानंतर अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्यानंतर तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 12/Nov/2025














