Chiplun: बहादूरशेख नाक्यावरील रस्त्याची अखेर दुरूस्ती

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथील पुलाजवळच्या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने येथील रस्त्याची दुरुस्ती केली. सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले त्यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेख नाका येथे वाशिष्ठी नदीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे. या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. चिपळूण शहराच्या बाजूने असलेल्या जोडरस्त्यावर काही वर्षापूर्वी डांबर टाकण्यात आले होते. ते डांबर वाहून गेले नंतर सिमेंट काँक्रीटने रस्ता तयार करण्यात आला. त्याचाही दर्जा निकृष्ट असल्यामुळे येथे वाहन चालवणे धोक्याचे झाले होते. काही महिन्यातच रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. शिवसेनेच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख निहार कोवळे यांनी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाला धारेवर धरले आणि रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सांगितले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे खड्डे भरून घेतले. सुमारे पाचशे मीटरचा रस्ता आता डांबरी झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 13-11-2025

Gim trainer