लांजा : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, एकूण १७ प्रभागांकरिता एकूण १९ मतदान केंद्रे स्थापन केली असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्याधिकारी कुंभार यांनी सांगितले, नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी एकूण १९ मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे. यावर्षी गोंडेसखळ या नवीन मतदान केंद्राची स्थापना केली आहे. एकूण मतदार हे १४,२३२ इतके असून, संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये वेगवेगळे टप्पे हाती घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहर परिसरातील सर्व महा ई-सेवा केंद्रांना आठवड्याचे सातही दिवस केंद्र सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक कालावधीमध्ये एसएसटी, एफएसटी, व्हीव्हीटी आणि व्हीएसटी ही चार पथके महत्वाची असतात. त्यापैकी एसएसटी आणि एफएसटी ही दोन पदके कार्यान्वित आहेत.
यामध्ये कोर्लेतिठा, कुवे गणपती मंदिर आणि साटवली रोड या ठिकाणीही एसएसटीची तीन पथके ठेवलेली असून, एकूण नऊ पथके आहेत. मतमोजणी केंद्र हे लांजा नगरपंचायतीचे बहुउद्देशीय हॉल, लांजा हायस्कूलशेजारी असून, त्या ठिकाणी स्ट्रॉगरूमदेखील तयार केला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी कुंभार यांनी दिली.
निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी सांगितले, एका मतदान केंद्रावर एक ईव्हीएम मशीन देणार असून, या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना संकल्पसिद्धी सभागृहाला या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतदार जनजागृतीचा कार्यक्रमदेखील होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 13/Nov/2025














