खेड : भरणे-दापोली राज्य महामार्गावरील भरणे येथील तालुका कृषी रोपवाटिकेसमोरील काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात झाली असली तरी पुढील टप्प्यात हे काम अडकण्याची शक्यता आहे. कारण, शहरात तब्बल ४२ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच राज्य महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या पालिका हद्दीत स्वरूपनगर परिसरात नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. महामार्गावर आधी काँक्रिटीकरण करून नंतर नळपाणी योजनेसाठी पुन्हा खोदाई करावी लागू नये म्हणून “आधी नळपाणी योजना, मगच महामार्ग” असा प्रशासनाचा निर्णय आहे. त्यामुळे महामार्गाचे काम सध्या थांबवण्यात आले आहे. दरम्यान, भरणेपासून तीनबत्ती नाक्यापर्यंतच्या महामार्गावर अनेक ठिकाणी दुकानांचा अडसर असल्यानेही प्रशासनाला पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दुकाने हटवण्याची जबाबदारी पालिकेवर असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीत उशीर होणार असल्याचे संकेत आहेत.
खेड-तीनबत्ती नाक्यापासून योगिता दंत महाविद्यालयापर्यंतचा मार्ग सध्या खड्डेमय आणि धुळीने भरलेला असून, वाहनचालक व पादचारी हैराण झाले आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास या समस्येतून दिलासा मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे; मात्र, नळपाणी योजनेला प्राधान्य दिल्याने आणि दुकाने हटवण्यात झालेल्या विलंबामुळे राज्य महामार्गाचे काँक्रिटीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 13/Nov/2025














