Chiplun : साफयिस्ट कंपनीतील कामगारांचे शुक्रवारपासून उपोषण

चिपळूण : तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफयिस्ट कंपनीतील कामगारांनी शुक्रवार (ता. १४) पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. कंपनीत २५ वर्षांपासून कार्यरत असेलल्या २४० पैकी ५८ कामगारांना नोकरीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल दसपटीतील ग्रामस्थांच्या मदतीने कंपनीसमोर उपोषण छेडण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

कामगारांवर झालेल्या कारवाईबाबत गेल्या महिन्यात आयुक्त कार्यालयात झालेल्या चर्चेत कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम यांनाही कामगारांनी निवेदन दिले आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी गाणे येथील केदारनाथ मंदिरात बैठक घेतली. या बैठकीला दसपटीतील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती.

स्थानिक कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यानुसार (ता. १३) पर्यंत सर्व कामगारांना कामावर न घेतल्यास शुक्रवार (ता. १४) पासून कंपनी गेटसमोर उपोषण सुरू करण्याचे ग्रामस्थ व कामगारांनी ठरवले आहे. या उपोषणाचे पडसाद दसपटीत उमटू लागले आहेत. पेढांबे ते खडपोलीदरम्यान खराब रस्त्यामुळे अवजड वाहतूक बंद आहे; मात्र प्रशासनाचा विरोध डावलून या मार्गावरून ३० ते ४० टन वजनांच्या मालवाहतूक गाड्या धावत आहेत. बुधवारी या विरोधात स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी आवाज उठवला. यापुढे अवजड वाहतूक रोखण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 13/Nov/2025

cake of the day