रत्नागिरी: जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. संगमेश्वर येथील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला LCB च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून अटक केली आहे. या आरोपीच्या अटकेमुळे राजापूर येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचीही उकल झाली आहे.
काय आहे संगमेश्वर चोरी प्रकरण?
दिनांक ०८ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान, संगमेश्वर एस.टी. स्टँडजवळ असलेल्या ‘दत्त कृपा मोबाइल शॉपी’मध्ये मोठी चोरी झाली होती. फिर्यादी राजेश तुकाराम आंबवकर यांच्या दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला होता.
चोरट्याने दुकानातून ३ मोबाईल फोन, १ जिओ राऊटर, १ पॉवर बँक, १ ब्लूटूथ हेडफोन आणि १ स्मार्ट घड्याळ असा एकूण ₹५१,४९९/- किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२५ (भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
LCB ने असा लावला तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, LCB चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी तात्काळ एक विशेष तपास पथक तयार केले.
या पथकाने घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. या तपासात, हा गुन्हा शंकर पाटील उर्फ शंकर साळुंखे (रा. कर्जत, जि. रायगड) याने केल्याची पक्की माहिती LCB ला मिळाली. आरोपी सध्या शहापूर (जि. ठाणे) येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच, LCB चे पथक तात्काळ शहापूर व मुरबाड येथे रवाना झाले.
आरोपीला शहापूर येथून अटक, दोन गुन्हे उघड
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी LCB पथकाने आरोपी शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील (वय २३ वर्षे, रा. गुंडगे, ता. कर्जत, जि. रायगड) याला शहापूर येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या शंकर साळुंखे याची कसून चौकशी केली असता, त्याने संगमेश्वर येथील मोबाईल शॉपी फोडल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला ₹१८,९९९/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजापूर मोटारसायकल चोरीचीही कबुली
आरोपी शंकर साळुंखे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. अधिक चौकशी केली असता, त्याने सुमारे १ महिन्यापूर्वी राजापूर येथून एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरल्याची कबुलीही दिली. या संदर्भात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९०/२०२५ (भा.न्या.सं. कलम ३०३ (२)) अन्वये आधीच गुन्हा दाखल होता. LCB च्या या कारवाईमुळे हा दुसरा गुन्हाही उघडकीस आला आहे.
सराईत गुन्हेगार, ४ दिवस पोलीस कोठडीत
आरोपी शंकर साळुंखे याच्यावर यापूर्वी रायगड व ठाणे जिल्ह्यांमध्ये चोरी व घरफोडीसारखे एकूण ३ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाणे करीत आहे.
कौतुकास्पद कामगिरी करणारी LCB टीम
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, LCB पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार पो. हेकॉ. विजय आंबेकर, पो.हेकॉ. विवेक रसाळ, पो. हेकॉ. दिपराज पाटील आणि चा.पो.कॉ. अतुल कांबळे यांनी बजावली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 13-11-2025














