General Election : देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी पहिला उमेदवारी अर्ज दाखल

संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला अखेर चौथ्या दिवशी मुहुर्त मिळाला असून चौथ्या दिवशी गुरूवारी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. नंदीनी नरेश सावंत यांनी प्रभाग क्र. १५ मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिले तीन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र अखेर चौथ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीसाठी युती-आघाडी झाली आहे. मात्र पहिले तीन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे राजकिय पक्षांचे उमेदवार कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार? अशी राजकिय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करायला मुहूर्त मिळाला असून शिवसेना शिंदे गटाच्या सौ. नंदीनी नरेश सावंत यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती झाली असून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, जनता दल, वंचित आघाडी यांची महाविकास आघाडी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. गुरूवारी पहिला उमेदवारी अर्ज भरला गेला आहे. यानंतर युती-आघाडी अपक्षांकडून जस जसे उमेदवारी अर्ज दाखल होतील. तस तसे निवडणुकीचे वातावरण आणखी तापायला सुरूवात होणार आहे. एकंदरीत सर्वच राजकिय पक्षांनी आपली ताकद आजमवण्यासाठी या निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरण्याचे ठरवले आहे. हळुहळु निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संपूर्ण देवरूख शहरात नाक्यानाक्यावर नगरपंचायतीच्या निवडणुकीचीच चर्चा ऐकावयास मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 14/Nov/2025