Dapoli Murud Beach : मुरुड किनाऱ्यावर ‘बीच सॅक’ संकल्पना अद्याप लालफितीत

दापोली : पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर ‘बीच सॅक’ ही अभिनव संकल्पना राबवण्याचा शासनाचा मानस होता, परंतु या संकल्पनेला जवळपास पाच वर्षे उलटली तरी ती संकल्पा अद्याप लालफितीतच अडकल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात या योजनेची सुचवणूक करण्यात आली होती. पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) च्या माध्यमातून या प्रकल्पाला गती देऊन स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती साधण्याचा उद्देश होता. मात्र आजतागायत ना ठोस आराखडा, ना प्रत्यक्ष अंमलबजावणी, परिणामी पर्यटनविकासाचे स्वप्न फक्त फाइलांपुरतेच मर्यादित राहिले आहे.

मुरुड किनारा हा निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असून, येथे डॉल्फिन सफारी, जलक्रीडा आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी लाखों पर्यटक आकर्षित होतात. या पार्श्वभूमीवर बीच सॅक संकल्पना स्थानिकांसाठी रोजगाराचे मोठे साधन ठरली असती, पण शासकीय उदासीनतेमुळे ती अधुरीच राहिली आहे.

स्थानिक विराज खोत यांच्या मते, ‘दापोली, मुरुड, कर्दे, हर्णे यांसारख्या किनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी सुसंगत पद्धतीने बीच सॅक उभारले गेले, तर कोकण पर्यटनाला नवे रूप मिळेल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराचे नवे दार खुले होईल. निसर्गाचा तोल न बिघडवता पर्यटन वाढवण्याचा हा प्रयत्न शासनाने प्रत्यक्षात उतरवला, तर दापोली तालुक्यातील समुद्र किनारे ‘कोकणचा गोवा’ ठरू शकतात, असा स्थानिकांचा विश्वास आहे.

बीच सॅक म्हणजे नेमके काय ?
बीच सॅक म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर असलेली एक लहान झोपडी, जी पर्यटकांना अन्न, पेये आणि इतर सेवा पुरवतात. ही एक पर्यटन-संबंधित संकल्पना आहे, जी विशेषतः सागरी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाते आणि अनेकदा स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करते. बीच सॅक हे या झोपड्यांच्या समूहांना किंवा धोरणांना सूचित करते, ज्यांची उभारणी पर्यटनाला चालना देण्यासाठी केली जाते.

पर्यटन विषयक योजना आणि संकल्पना जर दापोली समुद्रकिनाऱ्यावर प्रभावीपणे राबवल्या गेल्या, तर येथील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल- राकेश पालटे, पर्यटन व्यावसायिक, लाडघर, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 14/Nov/2025