साडवली : देवरूख शहरालगत मार्लेश्वरतिठा येथे बुधवारी सकाळी पोलिसांच्या स्थिर पथकाने गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत चार गुरांसह दहा लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्थिर पथकावर ड्यूटीवर असलेल्या महिला पोलिस माधुरी शिवाजी पिंगळे या वाहनांची तपासणी करत होत्या. या वेळी देवरूखहून कोल्हापूरकडे जाणारा टेम्पो थांबवून तपासण्यात आला असता त्यात गुरे दिसून आली. वाहनचालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने तीन गुरांचा परवाना दाखवला; मात्र गाडीमध्ये प्रत्यक्षात चार गुरे असल्याचे आढळून आले. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने महिला पोलिस पिंगळे यांनी तत्काळ देवरूख पोलिसांना कळवले.
पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव जाधव, हेडकॉन्स्टेबल अभिषेक वेलवणकर, पोलिस कॉन्स्टेबल सुहास लाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर चारही गुरे आणि टेम्पो जप्त करून देवरूख पोलिस ठाण्यात आणण्यात आला. जप्त केलेली गुरे किरदाडी येथील गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणी सैफान रमजान मुल्लाणी (वय २७, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी) आणि उदय दत्तात्रय मांगले (वय ४६, रा. साडवली, ता. संगमेश्वर) या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला हेडकॉन्स्टेबल आर्या वेलवणकर करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 14/Nov/2025














