संगमेश्वर : संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या गर्डरचे काम सुरू असल्याने १४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान मुंबई-गोवा मार्ग काही वेळ बंद राहणार असल्याने वाहनचालकांनी कोळंबे कोसुबमार्गे संगमेश्वर या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाने सुचविले आहे.
बुरंबी, मुचरीमार्गे कळंबस्ते या जिल्हाप्रमुख मार्गाचे काम झाले असते तर आज छोट्या वाहनचालकांना नक्कीच सोयीचे झाले असते. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, विघ्रवली, सोनवडे, मुचरी, कळंबस्ते रस्ता सुमारे ३० ते ४० वर्षे अस्तित्वात आहे; परंतु रस्त्यावरील मुचरी गवळवाडी ते कळंबस्ते हा भाग सुमारे २.५० ते ३. किमी भाग दुर्लक्षित आहे. तसेच वाहतुकीस योग्य नाही. हा रस्ता सुरक्षित असेल तर सध्या संगमेश्वर शास्त्रीपूल ते तुरळ हायवेवरील ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग होईल.
सध्या संगमेश्वर स्थानकाजवळ सोनवी पुलाच्या गर्डरचे काम सुरू असून, महामार्गाचे कामदेखील सुरू आहे. सोनवी चौकात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. याला पर्याय म्हणून देवरूखवरून जाणारा वाहनधारक संगमेश्वरकडे न जाता सरळ बुरंबीमार्गे कळंबस्ते फणसवणे, तांबेडी, चिखली, कडवई, तुरळ हायवेपर्यंत जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होईल. यासाठी मुचरी गवळवाडी दत्तमंदिर ते कळंबस्ते या रस्त्याच्या भागाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 14/Nov/2025














