Ratnagiri : ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी; जिल्ह्यात व्याख्यानमालेचे आयोजन

दापोली : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. गोवा येथील नामवंत साहित्यिक प्राध्यापक कृष्णाजी शामराव कुलकर्णी यांचे विविध विषयावर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात व्याख्याने संपन्न होणार आहेत. प्रा. कुलकर्णी गोमंतकांची अस्मिता या मुखपत्राचे गेल्या १२ वर्षापासून सहसंपादन करत आहेत. गोवा, कर्नाटकासह महाराष्ट्रातील विविध शहरात त्यांची व्याख्याने झाली आहेत.

रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथालय सप्ताहाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातही दिनांक १४ नोव्हेंबर पासून दापोली, खेड, चिपळूण, देवरुख, पाली, नाणीज, लांजा व राजापूर या ठिकाणी विविध विषयावर व्याख्याने होणार आहेत. दापोलीमध्ये दापोली तालुका ग्रंथालय संघ आणि ह. के. गोखले वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने जलस्वराज्य जालगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दु. ३वाजता वा. मान्यवरांच्या उपस्थितीत या व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रा. कुलकर्णी “संत साहित्याचा सामाजिक अन्वयार्थ” विषयावर व्याख्यान देणार आहेत.

दापोली तालुक्यातील सर्व वाचनालय कर्मचारी, वाचनालयांचे संचालक, अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, साहित्य संमेलन प्रमुख आणि संघ समन्वयक राकेश आंबेरकर व दापोली तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रविंद्र (भाई) कालेकर, ह. के गोखले वाचनालयाच्या अध्यक्षा मधुरा जोशी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 14/Nov/2025