Lanja : लांजा शहरात धुळीचे साम्राज्य!

लांजा : मुंबई-गोवा महामार्गाच्या लांजा शहरातील रखडलेल्या कामामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. परिणामी शहरातील व्यापारी, नागरिक, वाहन चालक, प्रवाशी आणि विद्यार्थी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. प्रचंड धुळीने श्वसनाचे आजारही होण्याची शक्यता असून लांजा नगरपंचायतीच्या धुरळ्यापेक्षा या धुरळ्याचा त्रास जास्त असल्याने हा धुरळा नको रे बाबा.. अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे.

लांजा शहरामध्ये महामार्गाची बिकट अवस्था झाली शहरातील कुंभारवाडा, बसवेश्वर चौक, बाजारपेठ, साठवली फाटा या ठिकाणी महामार्गाचे काम रखडलेले असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गावरून समोरून वाहन गेल्यास पाठीमागील वाहन चालकांना व पादचारी नागरिकांना दिसत नाही. महामार्गावरील धुरळ्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा असलेले व्यापारीवर्ग तसेच रिक्षा व टेम्पो व्यावसायिक धुळीने त्रस्त होत आहे. दुकाने, टपऱ्या शेजारील हॉटेलवर प्रचंड धुळीचे लोट बसत आहेत. लांजा शहरातील अर्धवट ठप्प पडलेल्या महामार्गाच्या कामामुळे शहरवासीय, प्रवाशी, वाहन चालक, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

धुळीच्या या त्रासामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात. सध्या लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडत आहे. मात्र या धुरळ्यापेक्षाही वाहनांच्या ये-जा करण्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून उडणारे धुळीचे लोट हे प्रचंड असल्याने आणि त्याचा मोठा त्रासही सहन करावा लागत असल्याने एक वेळ निवडणुकीचा धुरळा परवडला पण मुंबई गोवा महामार्गावर उडणारा हा धुरळा नको रे बाबा अशा मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

यावर्षी रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे पावसाळ्यात वाहन चालक, पादचारी व लांजा वासिय यांना चिखलाचा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर आता धुळीचे त्रास वाढला आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीकडून महामार्गावर कधीतरी अधुन मधून पाणी मारले जात आहे, मात्र पडणाऱ्या कडक उन्हामुळे पुन्हा स्थिती पूर्ववत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 14/Nov/2025