Chiplun : साफ यिस्ट कंपनीविरोधात कामगारांचे उपोषण सुरू…

चिपळूण : गाणे-खडपोली औद्योगिक साफ यिस्ट वसाहतीमधील साफ कंपनीविरोधात दोनशेहून अधिक कंत्राटी कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कामगारांना अचानक कामावरून कमी केले व पुन्हा घेण्यास मज्जाव केला. या विरोधात अनेक दिवस वाद सुरू आहे. मध्यंतरी आ. शेखर निकम यांच्या मध्यस्थानी काही कामगारांना कामावर घेण्यात आले होते. मात्र, उर्वरित कामगारांना अद्याप कामावर रूजू न करून घेतल्याने शुक्रवारपासून साफ यिस्टच्या सर्वच कामगारांनी कंपनीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

गेली अनेक वर्षे गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत यिस्ट तयार करणारी साफ यिस्ट कंपनी कार्यरत आहे. या ठिकाणी बहुतांश कामगार कंत्राटी आहेत. सुमारे २१० हून अधिक कामगार कंत्राटी असून त्यांना दिवाळीपूर्वी कामावरून अचानक कमी करण्यात आले. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी काही दिवस काम बंद आंदोलन देखील पुकारले व उपोषण देखील केले होते. याची दखल उद्योगमंत्री उदय सामंत, आ. शेखर निकम, भाजपचे प्रशांत यादव, ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी अशा राजकीय पक्षांनी घेतली होती.

यानंतर कंपनी प्रशासनाने उर्वरित कामगारांना तीन महिन्यांच्या आत टप्प्याटप्प्याने कामावर घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पूर्ण न झाल्याने कंपनीतील सर्वच कामगारांनी काम बंद आंदोलन करून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये संतोष जाधव, सुधीर मोहिते, महेश मिसाळ, मुकुंद भुवड, राजाराम कदम, सुजय सकपाळ, जनार्दन पवार, सुमित गजमल, मिलिंद गजमल, मिलिंद जाधव, दीपक गजमल, विशाल कदम आदी कामगारांनी सहभाग घेतला आहे. आपल्या कुटुंबासह हे कामगार उपोषणाला बसले आहेत. दिवसभर या उपोषणाला राजकीय पक्षांच्या पदधिकाऱ्यांनी भेट दिली.

यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, दादा साळवी, शौकत मुकादम, अॅड. अमित कदम, निलेश कदम, या शिवाय ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना, भाजप पदाधिकारी अशा सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. या शिवाय दसपटी पंचक्रोशीतील गावांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:45 AM 15/Nov/2025