Khed : तिसंगी जंगलमय भागात हातभट्टीचा अड्ड्यावर कारवाई

खेड : खेड तालुक्यातील तिसंगी येथे निर्जन जंगलमय भागात गुप्तपणे सुरु असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर खेड पोलिसांनी धडक कारवाई करून एकास ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी दि. १३ रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात आली.

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस कर्मचारी नितीन रामदास चव्हाण यांनी केली. अटक आरोपीची ओळख रोशन सुभाष भोसले (वय ३५, रा. तिसंगी पिपळवाडी, ता. खेड) अशी करण्यात आली आहे. आरोपीने तिसंगी येथील रस्त्याच्या बाजूला उतारावरील निर्जन झाडीझुडपांच्या परिसरात हातभट्टी दारू गाळण्यासाठी भट्टी बांधून अवैधरित्या
दारू तयार केली जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.

कारवाईत एकूण ७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये अॅल्युमिनियमचे पसरट भांडे (किंमत २,५०० रु.), १० लिटर गरम उकळते रसायन (१,५०० रु.), १० लिटर गुलमिश्रित गाळलेली दारू (१,००० रु.), २००० लिटर थंड गुळमिश्रित रसायन (७०,००० रु.) इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. संपूर्ण पंचनामा व पुरावे नोंदवण्यासाठी ई-साक्ष अॅपचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक आरोपीस नोटीस देण्यात आली असून खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 15/Nov/2025