Ratnagiri : राज्य नाट्य स्पर्धेत ‘मंगलाक्षता’ नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल !

रत्नागिरी : सध्या लग्नाच्या बाजारात गुणांपेक्षा सुंदर चेहऱ्याकडेच बघितले जाते. एखादा कुरुप चेहरा असेल, तर त्याचा अपमान व कुचेष्टा केली जाते. गुण चांगले असूनसुद्धा चेहरा कुरुप असल्याने एका तरुणीचा लग्नाचा प्रवास कसा असतो आणि लग्न जमवण्यासाठी कशी ती संघर्ष करते याची उत्कृष्ट मांडणी ‘मंगलाक्षता’ या कलाकृतीत सादर करण्यात आली आहे. संवादफेक आणि लाजबाव अभिनय यामुळे ‘मंगलाक्षता’ या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. हे नाटक पुरुष विरहित होते. विशेष म्हणजे नाट्यगृहात हाऊसफुल्लचा बोर्ड लावण्यात आला होता.

राज्य नाट्य स्पर्धेतील रत्नागिरी केंद्रावर गुरुवारी खल्वायन रत्नागिरी या संस्थेने ‘मंगलाक्षता’ हा नाट्यप्रयोग सादर केला. श्रीराम हर्षे लिखीत हे नाटक मनोहर जोशी यांनी दिग्दर्शित केले आहे. हे नाटक पुरुष विरहित सादर करण्यात आले. या नाटकात एकूण सात पात्रांनी सहभाग घेतला होता. या सर्वांनीच आपल्या भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. नाट्य स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सादर झालेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. हाऊसफुल्ल बोर्ड लागूनसुद्धा अनेक जण उभे राहून हे नाटक पहात होते.

या नाटकाची कथा शोभना या तरुणीच्या भोवती फिरते. ही तरुणी दिसायला तशी कुरुपच असते. यामुळे तिचे लग्न जमत नाही. अनेक स्थळे येतात, परंतु ती नकार देऊन जातात. ही शोभना नोकरी करून आपली आई सरला काकू आणि लहान बहीण मोहिनीचा सांभाळ करते. त्यांचे वडील हे लहाणपनीच गेलेले असतात. यामुळे या घरात त्या तिघीच असतात. मोहिनी ही
महाविद्यालयीन शिक्षण घेत असते. तिला रूपाचा गर्व असतो. यामुळे ती नेहमीच शोभनाला टोमणे मारत असते.

शोभनाला अनेक मुलगे बघून जातात. परंतु कोणीही पसंत करत नाहीत. अशातच एकदा लक्ष्मीबाई या आपल्या मुलासाठी तिला बघण्यासाठी येतात. परंतु त्याही नकार देतात. उलट त्यांच्या मुलाला मोहिनी पसंत पडते. या प्रसंगामुळे शोभना खचूनच जाते. शेवटी शोभना हिला तिच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका साने नावाच्या तरुणाशी मैत्री होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. परंतु साने या तरुणाचे यापूर्वीच लग्न झालेले असते. तो त्याच्या बायकोला घटस्फोट देण्याच्या तयारीत असतो. मूळात साने हा तरुण स्त्रीलंपटच असतो. यापूर्वी त्याने मोहिनी तसेच मोहिनीची मैत्रीण चंचला यांच्याशी लगट व प्रेमपत्र पाठवलेली असतात. त्याचे हे प्रताप कळल्यानंतर शोभना त्याच्यापासून संबंध तोडते.

दरम्यानच्या काळात मोहिनी ही घरात भांडण करून घर सोडून जाते. ती चित्रपटात काम करून आपण पोट भरू, असे सांगते. यापूर्वी नकार आलेल्या लक्ष्मीबाईच्या मुलाकडून पुन्हा शोभनाला मागणी येते. कारण त्या मुलाचं लग्न ठरलेलं असताना दोन दिवस अगोदर ती नवरी मुलगी हृदयविकाराच्या झटक्याने मरते. यामुळे लक्ष्मीबाई शोभनाला मागणी घालतात. मात्र शोभना या सर्व गोष्टीला नकार देते आणि आपण जन्मभर अविवाहितच राहू असे सांगते. याच दरम्यान मोहिनीसुद्धा घरी येते आणि तिच्यावर चित्रपट दिग्दर्शकाने जबरदस्ती केल्याचे सांगते.

एकंदरीत सुंदरता आणि कुरुप चेहरा यांचा कसा संघर्ष सुरू असतो, हे यातून दाखवण्यात आले. यामध्ये मोहिनी म्हणून सायली सोबळकर, चंचला नेत्रा केळकर, शोभना -नेहा उकीडवे, सरला काकू रश्मी केळकर, रमा- मानसी सोवळकर, सिता आदिती केळकर, लक्ष्मीबाई नेहा जोशी यांनी भूमिका पार पाडल्या. या सर्वांनीच उत्कृष्ट काम करत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. यामध्ये शोभना, मोहिनी व सीता यांची भूमिका लक्षवेधी ठरली. तर नेपथ्य प्रदीप तेंडूलकर, रंगभूषा शमीका जोशी, प्राजक्ता जोशी, प्रकाश योजना – मंगेश लाकडे, अमीत धांगडे, पार्श्वसंगीत – प्राजक्ता जोशी, वेशभूषा राधा दाते, निर्माता व सूत्रधार श्रीनिवास जोशी यांनी धुरा सांभाळली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 15/Nov/2025