रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाने प्रवाशांच्या सुविधा आणि प्रवाशांना हायटेक मार्गाने माहिती पुरवण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत अत्याधुनिक ‘व्हिडीओ वॉल’ची उभारणी केली आहे. या व्हिडीओ वॉलचे उद्घाटन कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याहस्ते तसेच कोकण रेल्वे महिला कल्याण संघाच्या प्रमुख श्रीमती मनीषा झा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ही आधुनिक व्हिडीओ वॉल प्रणाली प्रवाशांना रेल्वे गाड्यांची रिअल टाईम माहिती, महत्त्वाच्या घोषणा, सुरक्षा संदेश आणि पर्यटनाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी देणार आहे.
त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुलभ आणि माहितीपूर्ण होईल, असा कोकण रेल्वेने विश्वास व्यक्त केला आहे. कोकण रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सुविधा सुरु केल्या आहेत ऑनलाइन तिकीट सेवा, डीजिटल माहिती केंद्रे आणि स्मार्ट डिस्प्ले बोर्ड्स या उपक्रमांनंतर आता ही नवीन व्हिडिओ वॉल प्रवासी सेवेत महत्त्वाची भर घालणार आहे. ही सुविधा सध्या मडगाव स्थानकावर सुरू करण्यात आली असून, लवकरच कोंकण रेल्वेच्या इतर प्रमुख स्थानकांवरही अशा डिजिटल वॉल्स बसवण्याचे नियोजन आहे.
कोकण रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध आहे. ही व्हिडीओ वॉल प्रणाली आमच्या डिजिटल उपक्रमांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे- संतोष कुमार झा सीएमडी, कोकण रेल्वे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 15/Nov/2025














