Chiplun : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर यांचा राजीनामा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर यांनी पक्ष सदस्यत्वासह युवक राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण न.प. निवडणुकीत उमेदवारी देताना आपल्याला डावलल्याच्या रागातून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष लियकात काद्री यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक शहर अध्यक्ष श्रीनाथ पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ऐन निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. यातून आता असंतोष व खदखद बाहेर येऊ लागली आहे.

श्रीनाथ खेडेकर यांनी वीस वर्षे पक्षाचे काम केले आहे. उमेदवारी देताना वरिष्ठांनी नवख्यांना संधी दिली असून त्यातून खेडेकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा देताना माजी आ. रमेश कदम यांच्याबद्दल नाराजी हे असेही जाहीर केले आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही आपण पक्षाबरोबर राहिलो. संघटनेसाठी काम केले. कै. श्रीकृष्ण खेडेकर यांचे पक्षातील योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती देण्याची वेळ आली असताना आज आपल्याला डावलण्यात आले. यामुळे खेद वाटतो. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे. यामुळे हे सहन होत नसल्याने आपण राजीनामा दिल्याचे श्रीनाथ खेडेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 15/Nov/2025