Ratnagiri : सावर्डेतील दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

चिपळूण : जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसदलाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अंतर्गत तालुक्यातील सावर्डे पोलिस ठाणे हद्दीतील सुमित अविनाश झिंगे व यासीन महामुद काद्री या दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सुमित अविनाश झिंगे (वय २८, रा. कोष्टेवाडी, निवळी) याच्यावर हातभट्टीद्वारे गावठी दारू तयार करणे आणि विक्री करणे असे एकूण सात गुन्हे आहेत. यासीन महामुद काद्री (वय ६०, रा. सावर्डे अडरेकर मोहल्ला) याच्यावर अमली पदार्थाचे सेवन व बेकायदेशीर ताबा या संबंधी तीन गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलिस ठाण्यांना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचलण्याच्या सूचना दिल्यानंतर सावर्डे पोलिस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनानुसार, सावर्डे पोलिस ठाण्याकडून दोन्ही संशयितांना रत्नागिरी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दोन्ही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 17/Nov/2025