Ratnagiri : एनसीसीच्या कोकण विजय मोहिमेअंतर्गत स्वच्छतेचा संदेश

रत्नागिरी : महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीच्या कॅडेट्सनी मेनू २०२६ कॅम्पदरम्यान कोकण विजय मोहिमेअंतर्गत विविध पर्यटनस्थळांना भेट देत स्वच्छतेचा संदेश दिला. या सागरी नौकाभ्रमण मोहिमेअंतर्गत रत्नागिरी, रनपार, पूर्णगड, आंबोळगड, धाऊलवल्ली आणि विजयदुर्ग येथे स्वच्छ कोकण-सुंदर कोकण हा संदेश देण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.

नौकानयन, नकाशावाचन, शस्त्रप्रशिक्षण, प्राथमिक वैद्यकीय मदत, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी यांसोबतच समुद्रकिनारा स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित उपक्रम राबवण्यात येत आहेत. कॅडेट्सनी भारतीय नौदलातून निवृत्त झालेले जहाज आयएनएस एक्स – गुलदार, ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला व परिसरातील महत्त्वाच्या सांस्कृतिक स्थळांना भेट दिली. समुद्रीसुरक्षा, देशाच्या नौदल इतिहासाची ओळख व वारसा संवर्धनाचे महत्त्व कॅडेट्सना या दौऱ्यातून प्रत्यक्ष अनुभवता आले. या जहाजावर कॅडेट्सना जहाजरचना, नौदलातील शिस्त आणि समुद्री मोहिमांदरम्यान वापरली जाणारे विविध तांत्रिक साधने यांची माहिती मिळाली.

कॅडेट्सनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जाणारा विजयदुर्ग किल्ला पाहिला. किल्ल्याच्या बांधकाम कौशल्याबरोबरच समुद्री व्यापार व संरक्षणात त्याची भूमिका या विषयी मार्गदर्शकांनी सविस्तर माहिती दिली. विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी तसेच आयईएस शाळेत सादर केलेले सामाजिक संदेशात्मक पथनाट्य, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, पर्यटनस्थळांची स्वच्छता व स्थानिक नैसर्गिक संपत्तीचे जतन याबाबत जनजागृती केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय नौदलाचे अधिकारी, आयईएस शाळा व्यवस्थापन, गावकऱ्यांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे कॅडेट्समध्ये देशप्रेम, वारसा जतनाची जाणीव व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

स्थानिकांचा प्रतिसाद
कॅडेट्सनी सागरी प्रदूषण नियंत्रण, किनारपट्टी संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याबाबत शपथ घेतली. राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधून आलेल्या एनसीसी कॅडेट्सनी स्थानिक समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छ कोकण सुंदर कोकण ही जनजागृती मोहीम राबवली. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनीही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 17/Nov/2025