Breaking: भाजपच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीचा धडाका! रत्नागिरी प्रभाग १० मध्ये ‘कमळ’ अडचणीत

रत्नागिरी:
नगरपालिका निवडणुकीच्या (Nagar Palika Election) रणधुमाळीत रत्नागिरी शहरात आता राजकीय रंगत वाढत चालली आहे. अनेक प्रभागांमध्ये बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून, यामुळे भाजपच्या (BJP) गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

विशेषतः, भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक दहामध्ये (Prabhag 10) भाजपनेते आणि कट्टर कार्यकर्ते विभव पटवर्धन (Vibhav Patwardhan) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

आरक्षणामुळे नाराजी, ओबीसी उमेदवाराला संधी
प्रभाग १० चे आरक्षण सर्वसाधारण पडलेले असतानाही भाजपने एका ओबीसी उमेदवाराला संधी दिली आहे. या निर्णयामुळे प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसाधारण गटातील इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
या नाराजीला वाट करून देत विभव पटवर्धन यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. “आरक्षण सर्वसाधारण असताना ओबीसी उमेदवाराला संधी दिल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे,” असे पटवर्धन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.

कार्यकर्त्यांचा आग्रह, पटवर्धन यांनी भरला अर्ज
या प्रभागातून भाजपने राजू तोडणकर (Raju Todankar) यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, काल टिळक आळी येथील भाजपच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी विभव पटवर्धन यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह धरला.

कार्यकर्त्यांच्या मागणीचा मान ठेवत, पटवर्धन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे प्रभाग दहामध्ये भाजप विरुद्ध भाजप (बंडखोर) असा सामना पाहायला मिळणार असून, या बंडखोरीमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 17-11-2025