सावर्डे : हवामानातील बदलामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, स्वच्छतेचे पालन केल्यास हे रोग टाळता येऊ शकतात, असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्यकेंद्र सावर्डेचे पर्यवेक्षक प्रफुल्ल केळसकर यांनी केले.
ते गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे आयोजित साथीच्या रोगांविषयी जनजागृती शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्र सावर्डे यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी स्वाती सलवार, नम्रता कुंभार, निशा दिंडी, रोशनी सावंत उपस्थित होत्या.
या वेळी केळसकर म्हणाले, ‘आरोग्यदायी जीवन हेच आनंददायी जीवन आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव अनमोल आहे. त्याची योग्य काळजी घेतली आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर आपले जीवन सुंदर आणि निरोगी बनते. या शिबिरात डेंगी, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्लू यांसारख्या साथीच्या रोगांची लक्षणे, त्यावरील उपचार आणि प्रतिबंधक उपाय यावर सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले तर अशोक शितोळे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 17/Nov/2025














